विशाल कदम :- महान्यूज लाईव्ह
पुणे : अवैध मटका नावाचा जुगार चालविणाऱ्या दोन आरोपींना जुन्नर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २५) अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हमीद इस्माईल शेख (रा.पोल्ट्री फार्मच्या बाजुला बारव, जुन्नर, जि. पुणे) आणि सरजित तान्हाजी पवार ( रा.गणेश पेठ, जुन्नर, जि. पुणे) असे अटककरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हमीद शेख आणि आरोपी सरजित पवार हे दोघेही बेकायदेशीर मटका चालवीत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, पोलिसांना वरील दोन्ही आरोपी मोबाईल च्या सहाय्याने कल्याण नावाचा मटका पावत्यासहित चालवीत असताना आढळून आले.
पोलिसांनी आरोपी हमीद शेख आणि सरजित पवार या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम ८१२० रुपये आणि २३ हजार ५०० रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल असा एकूण सुमारे ३१ हजार ६२० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी हमीद शेख आणि आरोपी सरजित पवार यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.