सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळगाव मध्ये पोत्यामध्ये गांजा भरून ठेवणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 65 हजार रुपयांचा गांजा जप्त केला.
लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्य व्यवसाय तसेच मालमत्तेविषयक चोरीचे गुन्हे घडु नये म्हणुन पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या गस्ती सुरू आहेत.
यातच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय बातमीदाराकडून शेळगाव (ता. इंदापुर जि.पुणे) गावचे हद्दीत सागर साहेबराव मोहिते यांने आपल्या घरामध्ये गांजा ठेवला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांचेकडे छापा घालण्याची परवानगी मागून सागर साहेबराव मोहिते रा. शेळगाव याच्या घरी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, फौजदार खंदारे, हवालदार माने, श्री. खाडे, अमर थोरात, अजित थोरात, अमोल चितकोटे, मोहिते, बेलदार, होमगार्ड खुडे, हगारे, कुंभार, पताळे यांच्या पथकाने छापा घातला.
यावेळी त्याच्याजवळ 50 हजार 544 रुपये किंमतीचा दोन किलो वजनाचा गांजा आढळून आला. एक पांढऱ्या रंगाची दोन बंधाची पिशवी तिच्यामध्ये खाकी रंगाचे दोन पुडे, त्यापैकी एका पुड्यात गांजा व दुस-या पुढ्यात 2 किलो 106 ग्राम वजनाचा गांजा असा मिळुन आला.
त्यानंतर श्री दिलीप पवार यांना पुन्हा गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शेळगाव गावच्या हद्दीतच ज्ञानदेव सुदाम मदने रा. शेळगाव यानेही विक्रीसाठी आपल्या घरामध्ये गांजा ठेवलेला आहे अशी बातमी मिळाल्याने वरील स्टाफ, पंच यांनी ज्ञानदेव सुदाम मदने याच्याही घरी छापा घातला असता त्याचे लाकडी कपाटामध्ये 15,180/- रुपये किंमतीचा पांढऱ्या रंगाच्या दोन बंधाच्या पिशवीमध्ये 1 किलो 265 ग्रँम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
त्यावरून पोलिसांनी सागर साहेबराव मोहिते (2) ज्ञानदेव सुदाम मदने दोन्ही रा. शेळगाव ता. इंदापुर जि.पुणे या आरोपींविरुद्ध बिगरपरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगला, म्हणून हवालदार माने यांनी एन.डी.पी.एस. अँक्ट 1985 चे कलम 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.











