सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 23 जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत लॉकडाऊन च्या कालावधीतील पगारावर तोडगा काढला. त्याचबरोबर ऑक्टोबर 2020 पासूनचा तीन टप्प्यातील महागाई भत्ता 923 रुपये प्रत्येकी अदा करण्याचा निर्णय घेतला आणि करारात ठरल्यानुसार तीन गळीत हंगाम पूर्ण केलेल्या एकत्रित पदरावरील कामगारांना हंगामी कायम कामगार म्हणून सामावून घेण्यास तत्वतः मान्यता दिली. त्याचबरोबर या कामगारांना 18379 रुपये पगार करण्यास मान्यता दिली. कामगारांची इतर देणी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने देण्याचे संचालक मंडळाने मान्य केले.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 180 कामगारांचा हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र संचालक मंडळाने यावर तोडगा काढला. कामगारांनीही अडचणीच्या काळात मोठा दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त केले. या निर्णयाचे स्वागत करत शुगर वर्कर्स युनियन ने कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांचे कामगार संघटनेने आभार मानले.











