राज्यातील १० कोटी जनतेसाठी अर्थमंत्र्यांची व मुख्यमंत्र्यांची दहा मिनीटांत स्वाक्षरी
मुंबई : महान्यूज लाईव्ह
ज्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे आंदोलन सुरू होते, त्याच काळात राज्यात एक घडामोड अशीही होत होती की, राज्यातील १० कोटी लोकांना दिलासा देण्याची..कोरोनाच्या संकटाने राज्यातील सर्वच घटकांचे कंबरडे मोडले आहे, आर्थिक कणा ढासळलेल्या या सर्वच कुटुंबांसाठी महात्मा फुले जनारोग्य अभियानाचा लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असून कोरोनाच नव्हे तर अन्य आजारांवरही मोफत उपचार करण्याची योजना सरकार जाहीर करणार आहे.
या योजनेचा संपूर्ण तपशील आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या योजनेला मान्यता देऊन मंजुरी दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात आराखडा तयार केला होता. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्वच कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. अशा स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये येणारा सव्वा ते दीड लाखांचा खर्च पाहून आताच अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. आपल्याबाबतीत असे झाल्यास काय करायचे या विवंचनेत शहरातील कुटुंबे आहेत. त्याचा परिणाम मानसिकतेवर होत असल्याने या सर्वच स्तरातील कुटुंबांना यासाठी दिलासा देण्याची आवश्यकता होती. राज्य सरकारने यात सर्वसमावेशक विचार करून राज्याच्या प्रचलित आरोग्यविमा योजनेची व्याप्ती वाढवून या योजनेत सर्वाचाच समावेश करण्याचा विचार चालवला आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.











