विशाल कदम :- महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील एका खाजगी हॉटेलसमोर बेकायदेशीररित्या गांज्या बाळगल्या प्रकरणी एका आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी मंगळवारी (ता. २२) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीचा साडेपाच किलो गांजा जप्त केला आहे.
शिवराज काशिनाथ बक्के (वय- ३९, रा. डिग्री रोड, मारुती मंदिराजवळ, उमरगा, जि. उस्मानाबाद ) असे गांज्या जप्त करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस कर्मचारी मयूर मदन सूर्यवंशी (वय- ३६) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते. त्याचवेळेस गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी चालकाला कुंजीरवाडी हद्दीतील एका खाजगी हॉटेलच्या बाजूला चारचाकी वाहन थांबवण्यास संगितले. चारचाकी वाहन थांबल्यानंतर गाडीतील गुन्हे शाखेच्या पथकातील सर्वजण खाली उतरले असता, हॉटेलच्या शेजारी असलेल्या ठिकाणी शिवराज बक्के हा एका पांढर्या रंगाची गोणी घेऊन उभा असलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिस दिसल्यामुळे शिवराज बक्के याने तेथून पळ काढण्यास सुरवात केली.
पोलिसांनी शिवराज बक्के याच्या जवळ असलेल्या गोणीची पाहणी केली असता, त्यामध्ये बिया बोंडासह हिरवट काळसर रंगाचा ओलसर गांजा मिळून आला. गांज्याचे वजन केले असता साडेपाच किलो भरले. त्याची किंमत १ लाख १० हजार रुपये आहे. त्याला अटक केली असून पुढील तपास अमंली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस करीत आहेत. ही कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथक – २ चे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, पोलिस नाईक चेतन गायकवाड, साळुंके मयूर सूर्यवंशी यांनी केली.











