प्रदीप गारटकर यांची २८ वर्षांची परंपरा, राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते वितरण
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : गेल्या २८ वर्षांपासून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर इंदापूरात इफ्तार पार्टी आयोजित करतात. यावर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेत लॉकडाऊनच्या काळात झालेली नागरिकांची कोंडी लक्षात घेऊन त्यांनी इफ्तार पार्टीऐवजी रमजान ईद साठी मुस्लीम बांधवाकरीता जीवनावश्यक वस्तू देण्याचा संकल्प करण्यात आला. राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी आज या वस्तूंचे किट इंदापूरातील मुस्लीम बांधवांना वितरीत केले.
माझा गाव, माझी माणसे हा उपक्रम प्रदीप गारटकर गेली २८ वर्षे अखंडीत राबवित आहेत. यावेळी त्याचे स्वरुप थोडे बदलून इफ्तार पार्टीत केवळ मुस्लीम बांधवांनाच सहभागी करता आले असते, मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किटमुळे त्याचा उपयोग संपूर्ण कुटुंबासाठी व रमजान ईदच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व हितचिंतकांसाठी होईल असा विचार करून तशा स्वरुपाचे आवश्यक वस्तूंचे किट देण्याचा निर्णय गारटकर यांनी घेतला. आज शहरातील संत रोहिदास मंदिरात हा उपक्रम पार पडला. यावेळी शहरातील मुलाणी पट्टा, मोमीन गल्ली, मणेरी गल्ली, कुरैशी मोहल्ला, कसबा या परीसरातील मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रमजान ईदसाठी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनमंतराव कोकाटे, शहराध्यक्ष अनिल राऊत, अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे, रोटरी क्लबचे इंदापूर शहराध्यक्ष राकेश गानबोटे, अल्ली मोमीन, अहमदरजा सय्यद, मतीन शेख, मुन्ना शेख, बन्सी भंडलकर आदी उपस्थीत होते.










