विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
पुणे : साधु वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे येथील विद्यार्थिनी व शिक्षकांनी मिळून ”आंतरराष्ट्रीय योग दिन” सोमवारी (ता. २१ ) ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
”जागतिक योग दिना”च्या निमित्ताने महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा आणि योगाचे फोटोचे प्रदर्शन अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजेत्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रीप्रिया गोपालकृष्णन यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल क्षीरसागर हिला ‘उत्कृष्ठ योगासने सादरीकरणाचा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्या गोपालकृष्णन म्हणाल्या की, योग ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये शरीर, मन आणि आत्मा एकाग्र होते. यामुळे मानसिक ताण कमी करण्यास मदत होते. म्हणूनच सर्व नागरिकांनी दैनंदिन जीवनामध्ये योगासने करून स्वस्थ राहण्याचा सल्ला दिला आहे.
महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनिषा कदम यांनी विद्यार्थिनींना योगासनाचे विविध प्रकार शिकवून मार्गदर्शन केले. तर डॉ. मनोज मतनानी यांनी ‘राजयोग ध्यान’ याबद्दल माहिती सांगून दैनंदिन जीवनामधील ध्यानाचे महत्व योगदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कोविड नियमांचे तंतोतंत पालन करून आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकारी नमिता पाठक व रुपाली शिंदे यांचे विशेष सहकार्य मिळाले.











