दौंड : महान्युज लाईव्ह
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक पध्दतीने दौंड तालुक्यात आतापर्यंत 37 विवाह संपन्न झाले आहेत. पाटस येथे नुकताच पारंपारिक अनिष्ट रूढीला फाटा देत बनकर आणि बारवकर या कुटुंबांनी सत्यशोधक पध्दतीने विवाह पार पडला. विशेष म्हणजे एका महिलेने हा सर्व विधी करून हा विवाह लावला आहे. पाटस येथे हा सत्यशोधक पध्दतीचा हा तिसरा विवाह पार पडला आहे.
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा सुरू केला. त्याची प्रेरणा घेऊन दौंड तालुक्यातील ओबीसी समाजात विशेषत माळी समाजात मोठे परिवर्तन होत आहे. त्याचे नुकतेच उदाहण म्हणजे पाटस येथील राजाराम अर्जुनराव भागवत यांची कन्या कल्याणी आणि बाळासाहेब सिताराम बारवकर. (रा. सुपा. ता .बारामती ) यांचे चिरंजीव स्वप्निल यांचा रविवारी ( दि.20 ) सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला.
रुढी परंपरेला पूर्ण फाटा या विवाह सोहळ्यात दिला गेला, बहुजन महापुरुषांच्या तैलचित्रांना पुष्पहार घालून आणि भारतीय संविधानाचे वाचन यावेळी वधु आणि वराने केले. विशेष म्हणजे पुष्पाराणी बनकर या महिलेने सत्यशोधक विवाह सोहळ्याच्या सर्व विधीचे पठण करून हा विवाह लावला.
बहुजन महामानवांच्या कार्याची व विचारांची प्रेरणा घेऊन पाटस मध्ये आतापर्यंत तिसरा व दौंड तालुक्यातील 37 वा विवाह सत्यशोधक पध्दतीने पार पडला. सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून समाजामध्ये एक नवीन क्रांतिकारक बदल घडवून आणला आहे. महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या समाजरचनेत एका महिलेनेच हा विवाह लावला. यामुळे उपस्थित असलेल्या नातेवाईकांनीही या बदलाचे स्वागत केले.











