माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – गेल्या पंधरा दिवसांपासून राजगड पोलिसांनी अवैध धंद्यांना लगाम घातला असून पुणे – सातारा महामार्गावरील रस्त्यावरील खेडशिवापूर टोलनाक्याजवळ असलेल्या एका हॉटेल शेजारी एक लाल रंगाच्या ट्रकमध्ये चालवलेला गुटखा राजगड पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत ३९ लाख ३७ हजार ५०० रुपये असून राजगड पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने वरिष्ठांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एका लाल रंगाच्या ट्रकमध्ये बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर तातडीने राजगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निखिल मगदूम, सहायक उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार संतोष तोडकर, संतोष कालेकर, सोमनाथ जाधव इतर कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ट्रकला महामार्गावर अडविले.
(क्र. एमएच ०९ सीडब्ल्यू ३८९७) या ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये हिरा पान मसाल्याची तब्बल २५० पोती, तसेच हिरव्या रंगाच्या सुगंधी तंबाखूची २५० पोती आढळून आली. हा गुटखा तसेच ट्रक दोन्ही मिळून रक्कम रुपये ५१,३७,५०० ( एक्कावन्न लाख सदोतीस हजार पाचशे रुपये) माल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी ट्रकमधील असलेला माल स्थानिक पंचांसमक्ष सील करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक निखिल मगदूम करीत आहेत. राजगड पोलिसांची ही मोठी कारवाई मोठ्या शिताफीने केली असल्याने नागरिकांकडून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.











