राज्य शासनाचा केला निषेध
सुरेश मिसाळ, इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्य सरकार कोरोनाचे संकट रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे भाग्यश्री निवासस्थानाच्या अंगणात शुक्रवारी (दि.22) महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले. यावेळी युवा नेते राजवर्धन पाटील हेही या आंदोलनात सहभागी झाले होते.
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील महाआघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्य सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र बचाओ आंदोलन प्रसंगी केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशामध्ये महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग सर्वाधिक आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू होऊन २ महिने झाले, तरीही कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी न होता वाढतच चाललेला आहे, त्यामुळे दररोज अनेक नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. अनेकवेळा रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. कोरोना रुग्णावरती उपचारांमध्ये राज्य सरकार अपयशी ठरले आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता त्रस्त असून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे. राज्यात तसेच इंदापूर तालुक्यात जनतेच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगातून गावागावात कामे सुरू करण्यात यावीत. लॉक डाऊनमुळे जनता अडचणीत असल्याने मागणीनुसार तत्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करण्यात यावेत. इंदापूर तालुक्यात राज्यकर्ते कोरोनाचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहेत.
दरम्यान, इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंगणामध्ये महाराष्ट्र बचाओ आंदोलन केल्याचा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला.











