बारामती : महान्यूज लाईव्ह
अजित पवार आणि ऑन दी स्पॉट निर्णय हे समीकरण सत्तेत आणि सत्तेच्या बाहेरही कायम राहीले आहे. त्याला अपवाद मात्र भाजपच्या पाच वर्षांच्या सत्तेचा काळ राहिला. बारामती तालुक्यातील 1 आरोग्य उपकेंद्र बाबुर्डी गावात मंजुरीसाठी जिल्हा परिषदेने ठराव केला होता. मात्र भाजपची सत्ता आली आणि काम रेंगाळले! मात्र परवा गावच्या सरपंचांनी अजितदादांपुढे विषय मांडला आणि फक्त तीन दिवसात बाबुर्डीला आरोग्य उपकेंद्र मिळाले. थेट मंत्रालयातून तीन दिवसात निर्णय झाल्याने गावकऱ्यांना देखील सुखद धक्का बसला!
12 जून रोजी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्र दिले आणि या आरोग्य उपकेंद्राविषयी माहिती दिली. हे आरोग्य उपकेंद्र पाच वर्षापासून प्रलंबित होते. तांदूळवाडीसाठी हे मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र तांदुळवाडी गाव नगरपरिषदेत समाविष्ट झाल्याने. बाबुर्डी येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीने जिल्हा परिषदेमार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्रालयाला पाठवला होता. मात्र त्या दरम्यान भाजपची सत्ता आली आणि पुढील पाच वर्ष हे काम तसेच रेंगाळले.
परवा 12 जून रोजी उपमुख्यमंत्री बारामतीत आल्यानंतर त्यांच्याकडे हे पत्र दिले आणि या पत्रानंतर फक्त तीन दिवसात बाबुर्डीसह राज्यातील बारामती, इंदापूर, रत्नागिरी, खेड या तालुक्यांमधील आठ उपकेंद्रे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. भाजपची सत्ता आल्यापासून या ठिकाणी देखील उपकेंद्रे स्थलांतरित झाली नव्हती, त्यामुळे जी प्रलंबित उपकेंद्र होती. ती सर्व स्थलांतरित करण्याचा निर्णय अवघ्या एका दिवसात झाला.
या उपकेंद्रांमध्ये इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे शेटफळगडे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. भिगवण येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर स्थापन झाल्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला. तांदुळवाडी बारामती येथील उपकेंद्र बाबुर्डी येथे स्थलांतरित करण्यात आले, तर जळोची येथील उपकेंद्र जळोची ग्रामपंचायत नगर परिषदेमध्ये गेल्यामुळे हे उपकेंद्र गडदरेवाडी या बारामती तालुक्यातील गावात स्थलांतरित करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील उपकेंद्र चिपळूण तालुक्यातील मौजे कौंढर ताम्हणे या गावी स्थलांतरित करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश मुळे येथील उपकेंद्र जिल्ह्यातीलच गोळप या गावी उपकेंद्राच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे स्थलांतरित करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पालघर येथील उपकेंद्र इमारतीसाठी गावात जागा उपलब्ध नसल्याने मंडणगड तालुक्यातील केळवत या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
खेड तालुक्यातील आवाशी येथील उपकेंद्र खेड तालुक्यातील मौजे शिल्डी या गावात स्थलांतरित करण्यात झाले, तर काजिर्डा या राजापूर तालुक्यातील उपकेंद्राचे कोळंब या गावी स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोस्ते या गावातील उपकेंद्र इमारतीसाठी जागा उपलब्ध नसल्याने खेड तालुक्यातील निळीक या गावी स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला.
ज्ञानेश्वर पोमणे, सरपंच बाबुर्डी, ता. बारामती : अजितदादांनी या राज्यातील ज्या ज्या ठिकाणी स्थलांतराची कामे रखडली आहेत, त्या सर्व स्थलांतरित उपकेंद्रांविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला आणि तातडीने हा निर्णय झाला. अजितदादांच्या धडाक्यामुळे बाबुर्डीला गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आणि प्रतीक्षेत असलेले उपकेंद्र मिळाले आहे. त्यामुळे बाबुर्डी गावातील आरोग्याची समस्या दूर होण्याचा दिलासा मिळाला आहे.











