दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
कोरोनामुळे आई-वडिलांचे निधन झाल्याने वाई तालुक्यातील अनेक बालके अनाथ झाली आहेत. या बालकांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न आता समोर उभा राहणार आहे त्यामुळेच वाईतील स्वर्गीय दिनेश ओसवाल स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने या अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचा बारावीपर्यंत शैक्षणिक खर्च करणार असल्याची माहिती नगरसेवक दीपक ओसवाल यांनी दिली.
वाई भूषण स्वर्गीय पोपटलाल ओस्तवाल यांच्या जयंतीचे निमित्त साधून हा उपक्रम राबवला जाणार आहे. स्वर्गीय पोपटलाल ओस्तवाल यांनी आयुष्यभर भगवान महावीर यांचा दिलेला मूलमंत्र जपून गरजूंना मदत करण्यासाठी कायम पुढाकार घेतला होता. त्यांनी स्वर्गीय दिनेश ओसवाल प्रतिष्ठानच्या माध्यमातून तपासणीसाठी वाईमध्ये कायमस्वरूपी केंद्र उभारले. पुण्यातील देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीने आजही मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या प्रतिष्ठान मार्फत होतात.
याखेरीज वाई तालुक्यातील वेळे गावात करुणा मंदिर गोशाळेची स्थापना करून भाकड गायींचा सांभाळ करण्याचे काम पोपटलाल ओस्तवाल यांनी केले. या गोशाळेत सध्या सहाशे गाईंचा सांभाळ होतो. या बरोबरच त्यांनी गावोगावी मोबाइल सायन्स लॅब हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी उपक्रम सुरू केला. भारत विकास परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले.
मागील पाच-सहा दशकापासून मित्रांच्या सोबतीने त्यांनी वाई तालुका आणि शहरात एक मोठी सामाजिक चळवळ उभी केली. आपल्या समाजनिष्ठ कार्यातून त्यांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला होता. मात्र त्यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या सामाजिक कार्याचा मार्ग अविरतपणे सुरू ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
त्यांचाच आदर्श समोर ठेवून आता कोरोनाच्या काळात ज्यांचे आई वडील निवर्तले आहेत, अशा मुला मुलींना दत्तक घेऊन त्यांचा बारावीपर्यंत खर्च केला जाणार आहे अशी माहिती नगरसेवक दीपक ओसवाल यांनी दिली.











