माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किकवी दुरक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर राजरोस सुरू असलेल्या बनावट ताडी विक्री केंद्रांवर सासवड उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आदेशाने पोलिसांनी धाड टाकली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील ताडी विक्री केंद्राचे दोन प्रमुख सूत्रधार मात्र मोकाट फिरत आहेत.
सासवड उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांना किकवी ( ता. भोर ) येथील मोरवाडी मार्गावर एका मोबाईल टॉवरच्या लगत ओढ्याच्या शेजारी आड बाजूला ताडी विक्री सुरू असल्याचे खबर समजताच पाटील यांच्या आदेशाने पथकाने धाड टाकली. यावेळी बनावट ताडी विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संतोष अंबादास औरदकर वय ३२ याला ( सध्या रा. किकवी ( ता. भोर ) याला पोलिसांनी घटनास्थळी ताडी विक्री करताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
किकवी दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, सोमेश राऊत, श्रीकांत वाढणे, हवालदार जगदीश शिरसाट, निलेश होवाळ यांनी कारवाई केली. कारवाईत संतोष अंबादास औरदकर या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून २० लिटर बनावट ताडी जप्त केली आहे. पुढील तपास हवालदार जगदीश शिरसाट करीत आहेत.











