हातातोंडाच्या लढाईत कोंडीत सापडलेल्या कर्जदारांसाठी रिझर्व्ह बॅंकेचा मोठा दिलासा
मुंबई : महान्यूज लाईव्ह
रिझर्व्ह बॅंकेने कर्जदारांसाठी मोठी अडचण बनलेल्या कर्ज हप्त्यांची दखल घेत मार्च ते ऑगस्ट अशा सहा महिन्यांसाठी कर्जाचे हप्ते न भरण्याची मुदत दिली आहे. आतापर्यंत मे पर्यंत ही मुदत होती, आता पुन्हा तीन महिने ती वाढविल्याने कोणताच रोजगार हाताशी नसलेल्या व लॉकडाऊनमुळे व्यवहार थंड असलेल्या कर्जदारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या या घोषणेचा फायदा राज्यासह देशभऱातील कोट्यवधी कर्जदारांना होणार आहे. आता ऑगस्ट महिन्यापर्यंत कर्जाचा हप्ता भरला नाही, तरी चालणार आहे. अर्थात कर्जाच्या व्याजाची मात्र वाढ होणार आहे, तरीदेखील सध्या हातात पैसा नसतानाच्या काळात आपली पत मात्र खराब होणार नसल्याने कर्जदारांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परीषद घेऊन आज ही माहिती दिली. दास यांनी रेपो दरात आरबीआयने कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. ४.४० टक्के असलेला रेपो रेट आता ४ टक्क्यांवर आला असून या रेपो रेट कपातीमुळे कर्जावरचं व्याज आणखी कमी होणार आहे.
तसंच रिव्हर्स रेपो दरात देखील आरबीआयने पुन्हा ४० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. त्यामुळे आता रिव्हर्स रेपो दर कमी होऊन ३.३५ टक्के झाला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने हे मोठं पाऊल उचललं आहे.











