विशाल कदम: महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधनात्मक उपाययोजना आखल्या होत्या. यामुळे ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे उभारण्यात आलेले प्रतिभा कोविड सेंटरची रुग्णसंख्या घटल्याने हे सेंटर मंगळवारी (ता. १५ ) बंद करण्यात आले. शेवटच्या एका रूग्णाला झाड, सॅनिटायझर, मास्क देऊन निरोप देण्यात आला.
जिल्हा परिषद, रावलक्ष्मी फाउंडेशन आणि लोकसहभागयांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन व सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांसाठी कोरेगाव मूळ येथील प्रतिभा कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. हे सेंटर ९ मे रोजी सुरू करण्यात आले होते. या कोविड केअर सेंटरमध्ये १०० सुसज्ज बेडची तयारी करण्यात आली होती. या सेंटरमध्ये ४५ रुग्णांनी उपचार घेऊन बरे झाले आहेत. यामध्ये १६ महिला तर २९ पुरुषांचा समावेश आहे. अशी माहिती उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सूचिता कदम यांनी दिली.
दरम्यान, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हॅप्पी ग्रुपच्या सदस्यांकडून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून प्रतिभा केअर सेंटरला दोन वेळेच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे रुग्णांना चांगले जेवण, नाष्टा मिळत होता. कोविड सेंटरमध्ये चांगल्या सोयी सुविधा उभारण्यात आल्या होत्या. सेंटरशी संबंधित सर्व घटक रुग्णांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत होते. तसेच मन प्रसन्न होण्यासाठी सेंटरमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या कोविड केंद्रात सेवा देणार्या कोविड योद्ध्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनीषा कड, पोलिस पाटील वर्षा कड, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कानकाटे, भानूदास जेधे, सचिन कड, दत्तात्रय काकडे, संतोष काकडे, अमित सावंत, दिलीप शितोळे, प्रवीण शितोळे, यशोदा मंगल कार्यालयाचे मालक अमोल भोसले, प्रशांत कोतवाल, डॉ. समीर ननवरे, आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश वाळेकर यांनी केले तर आभार ग्रामसेवक विराज पवार यांनी मानले.











