सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : बायो सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्पांसाठी एक लाख कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दोन वर्षात साखर उद्योगासाठी दीर्घकालीन स्वरूपाची पूरक धोरणे राबवली. त्यामुळे सध्या अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला आधार मिळाला आहे अशी माहिती भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरा भीमा सहकारी साखर कारखाना येथे दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, साखर उद्योगासाठी इथेनाॅलचा पेट्रोलमधील 20 टक्के मिश्रणाचा भारत सरकारने घेतलेला निर्णय क्रांतीकारक आहे. या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे देशातील साखर उद्योग मजबूत होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे, तसेच अतिरिक्त साखर उत्पादनाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्यात येत आहे.
तेल कंपन्यानी चालू वर्षी 500 कोटी लिटर इथेनॉलचे टेंडर काढले असून आजपर्यंत साखर कारखान्यांनी सुमारे 370 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. आगामी पाच वर्षासाठी तेल कंपन्यानी 2500 कोटी लिटरचे टेंडर काढले आहे. तसेच एक टक्का डिपॉझिट हे इथेनॉल पेमेंट मधून घेण्याचा दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सध्या देशामध्ये ऊस हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने शाश्वत पीक असल्याने पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. त्यामुळे आगामी काळात ऊस क्षेत्र वाढले तरीही अतिरिक्त साखरेचा प्रश्न हा इथेनॉलची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती वाढणार असल्याने शिल्लक राहणार नाही,असेही पाटील यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. चालू हंगामात 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस केंद्र सरकारने अनुदान दिले आहे. यापूर्वी केंद्राने साखरेची एम.एस.पी. प्रति क्विंटल 3100 रुपये केली. आता त्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे. तसेच केंद्र सरकारने उसाची एफआरपी गेल्यावर्षी प्रति टन शंभर रुपयांनी वाढविली आहे. त्याचप्रमाणे इथेनॉलच्या दरात चांगली वाढ केली आहे.
राज्यात इथेनॉलचे सुमारे 100 पेक्षा अधिक प्रकल्प आहेत.आगामी काळात या प्रकल्पांचे विस्तारीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने व्याज सवलत योजना जाहीर केली असून 6 टक्के व्याज केंद्र सरकार भरणार आहे. आता राज्य सरकारने इथेनॉल प्रकल्पांच्या विस्तारीकरण कर्जावरील उर्वरित 6 टक्के व्याज भरावे, तसेच साखर कारखान्यांकडून उत्पादित इथेनॉल वरतीवरती 85 टक्के कर्ज द्यावे, त्यासाठी राज्य सहकारी बँकेने परिपत्रक काढावे, अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
देशात नुकत्याच संपलेल्या सन 2020-21 च्या गाळप हंगामात देशात 322 लाख टन साखरेचे उच्चांकी उत्पादन झाले आहे, केंद्र सरकारने 60 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिल्याने साखर उद्योगास दिलासा मिळाला आहे.असेही पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, सुरेश मेहेर उपस्थित होते.











