बारामती : महान्यूज लाईव्ह
जनाई उपसा सिंचन योजनेला पाणी सोडले की पैसे भरून देखील बाबुर्डी गावातील गायकवाड व ढोपरे मळा या दोन तलावांमध्ये पाणी पोहोचेपर्यंत वरवंड तलावातील पाणी संपायचे.. आणि हे तलाव तसेच रिकामे राहायचे.. या वर्षी उन्हाळ्यात देखील असेच झाले.. अखेर गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आणि अजितदादांनी गांभीर्याने यात लक्ष घालत अधिकार्यांना सूचना दिल्या आणि अखेर गायकवाड मळा व ढोपरे मळा हे तलाव भरून वाहिले!
जानाई योजना सुरू झाल्यानंतर बाबूर्डी गावातील तलावात पाणी येईपर्यंत वरवंड तलावातले पाणी संपायचे. कसेतरी लव्हेमळा तलावात थोडेसे पाणी मिळत होते. परंतू गायकवाड मळा तलाव आणि ढोपरे मळा तलाव हे जानाईच्या पाण्यापासून वंचित राहत होते. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत होते.
ही सर्व हकीकत गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहचवली आणि जानाई योजना सुरू झाल्यानंतर सूरवातीला बाबूर्डी गावातील तलावासाठी पाणी देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जानाई योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यामूळे मंगळवारी जानाई उपसा योजना सुरू झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने बाबूर्डी गावातील तलावासाठी पाणी दिले. आज लव्हेमळा तलाव, गायकवाड मळा तलाव, ढोपरेमळा तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहिले आणि शेतकऱ्यांनाही चांगला दिलासा मिळाला.











