ऍड. विजय सोनवणे, नगर
अनेकदा चोरी होते.. कधीकधी गुन्हेगार पोलिसांच्या हातीही लागतात, परंतु प्रत्येक दाखल गुन्ह्यांमध्ये चोरीमध्ये गेलेला सर्व ऐवज मिळून येतोच असं नाही.. अनेकदा तपासामध्ये क्लिष्ट बाबीदेखील असतात, तर अनेकदा गुन्हे लवकर उघड होत नाहीत.. अशा परिस्थितीमध्ये गेलेल्या चोरीच्या ऐवजावर लोकांना पाणी सोडावे लागते.. पण कर्जत तालुक्यातील विविध चोऱ्यांमध्ये गेलेला तब्बल पंधरा लाख रुपयांचा ऐवज परत मिळाल्यानंतर, अपेक्षाही न ठेवलेल्या फिर्यादींच्या हातात सोन्याचे दागिने मिळाले, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.. पोलिसांप्रती सतत कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचे डोळे आनंदाने भरून गेले होते…!
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात 5 मे 2021 रोजी मीना सर्जेराव महानवर यांच्या घरात धाडसी दरोडा पडला. रात्रीचे जेवण करून कुटुंबासह सर्वजण घरामध्ये झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात जिन्यामधून प्रवेश केला व मीना महारनवर आणि घरातील कुटुंबीयांना मारहाण करत घरातील कपाटामध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 15 लाख रुपये किमतीचा ऐवज दरोडा आणि घरफोडी करून चोरून नेला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव अहमदनगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके कर्जत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भेट देऊन पाहणी केली गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार कर्जत पोलिसांनी पाच पथके तयार करून तपासाला सुरुवात केली होती.
या पथकामध्ये पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक निरीक्षक सुरेश माने, फौजदार अमरजीत मोरे, कॉन्स्टेबल सुनील खैरे, श्याम जाधव, महादेव कोहक, रवींद्र वाघ, जितेंद्र सरोदे, गणेश आघाव, कोमल गोफणे, शाहूराज तिकटे यांचेही पथक होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, दत्तात्रय इंगळे, विश्वास बेरड, ववन मखरे, सचिन आडवल, सुनील चव्हाण, सुरेश माळी, विशाल दळवी, दिनेश मोरे, शंकर चौधरी, राहुल सोळंकी, सागर ससाने, रवींद्र घुंगासे, रणजित जाधव, सागर सुलाने, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, आकाश काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अंकुश ढवळे यांची दोन पथके होती.
तर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातील संग्राम जाधव, अरुण पवार, सचिन राठोड, संदीप राऊत यांचे एक पथक आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील दादासाहेब टाके, किरण बोराडे, गोकुळ इंगवले यांचे एक पथक अशी मिळून पाच पथके तयार करण्यात आली होती.
हा तपास सुरू असताना गुन्ह्याची पद्धत, या पूर्वीचा गुन्हेगारांचा इतिहास तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आत्ताची कार्यपद्धती आणि त्यांचा वावर या सर्वांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये तपास करत असताना या गुन्ह्याची संशयाची सुई बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिखली येथील एवन काळे याच्याकडे वळली. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक सुनील चव्हाण यांना गुप्त खबऱ्यांमार्फत हा गुन्हा एवन काळे यानेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली.
अर्थात एवन ला पकडणे तेवढे सोपे नव्हते, कारण एवन, त्याची बायको कांचन हे एरवी पारधी समाजाचे नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच राजकीय नेत्यांत उठबस दाखवणारे होते. त्यामुळे चेहरे एक आणि कार्यपद्धती वेगळीच अशी यांची पद्धत असली, तरी लोकमानसातील वावर असल्यामुळे सहजपणे पोलिसांना काम करून चालणार नव्हते. त्यामुळे पुरावे गोळा करत पोलिसांनी त्यांना पकडण्याची धडाकेबाज कल्पना आखली.
उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके आणि कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला व रात्रीच्या वेळी पाठलाग करून एवन हैवान काळे, मनीषा एवन काळे (वय 35 वर्षे, दोन्ही राहणार चिखली, तालुका आष्टी जिल्हा बीड), रेखा जनार्धन काळे (राहणार महिजळगाव तालुका कर्जत), कांचन एवन काळे व एका अल्पवयीन संशयितास पकडले.
पोलिसांनी गुप्तपणे राबवलेल्या या मोहिमेमुळे संशयितांच्या घराची झडती घेतल्यानंतर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल मिळून आला. यामध्ये चोरीस गेलेले दागिने व इतर चोरीतील सोन्याचे दागिने असे एकूण 15 लाख रुपयांचे तीस तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. आरोपीच्या घरातून रामपुरी चाकू, लोखंडी कटावणी, 30 हजार रुपयांचे वेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, पाच लाख रुपयांची स्कॉर्पिओ जीप आणि रोख रक्कम दहा हजार पाचशे रुपये असा एकूण 20 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. एवन काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत. त्याची बायको कांचन ही माहिती अधिकार कार्यकर्ता असून सतत पोलिसांविरोधात तसेच विविध ठिकाणी माहिती अधिकाराचे अर्ज करणे, तसेच त्रास देणे या बरोबरच आपण पारधी समाजाचे नेते आहोत अशी बतावणी करणे अशी कामे करतात. दरम्यान या सर्व प्रकरणाचा तपास फौजदार अमरजीत मोरे हे करत आहेत.











