शिरूर : महान्युज लाइव्ह
श्रीगोंदा (जि : नगर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर अडवून लुटणाऱ्या एका ठकास शिरूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले असल्याची माहिती शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा (जिल्हा अहमदनगर) पोलिस स्टेशन हद्दीत गाडी अडवून लुटणारा व्यक्ती शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत फिरत असल्याची माहिती शिरूर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शिरूर पोलिसांच्या पथकाला संशयित व्यक्ती हा मांडवगण फराटा हद्दीत गारमाळ परिसरात दुचाकीवरून जाताना दिसला. पोलिसांनी सदर संशयित व्यक्तीस पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली.
यावेळी पोलिसांनी या अबुल जफर इराणी (रा.पुणे स्टेशन, पुणे) याची अधिक चौकशी केली असता, त्याने अहमदनगर जिल्ह्यात आणखीन गुन्हे केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. आरोपीस ताब्यात घेऊन पुढील चौकशी कामी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, सहायक फौजदार साबळे, योगेश गुंड, विष्णू दहिफळे यांनी केला.











