सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 3 येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून लातूरकडे निघालेल्या चार चाकी गाडीचा टायर फुटल्याने रस्त्यावरुन खाली पडून दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला त्यातील एक जण गंभीर जखमी असून तिघेही लातूर जिल्ह्यातील आहेत मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघेजण पुण्यामध्ये जुनी चार चाकी घेण्यासाठी गेले होते. त्यांनी जुनी चार चाकी गाडी विकत घेतली आणि ते गाडी नव्याने खरेदी केल्याच्या आनंदात लातूर कडे निघाले होते. संध्याकाळी सहा साडेसहा वाजता त्यांची गाडी भिगवण येथून पुढे आली. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज नंबर 3 येथे अचानक गाडीचा टायर फुटल्याने गाडीने पलटी खात रस्त्यावरून खाली खड्ड्यात गाडी पडली.
वरून गाडी पडल्याने गाडी पूर्ण चेंगरली. आणि यामध्ये तिघे जण सापडले. स्थानिक नागरिकांनी बराच प्रयत्न करून एकास बाहेर काढले. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांची ओळख पटलेली नाही. गाडीतून मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड मेहनत करावी लागली दरम्यान इंदापुरातील सतीश जाधव, सचिन जाधव, प्रवीण पाटील व स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली.











