शिरूर : महान्यूज लाईव्ह
रांजणगाव एम.आय.डी.सी. समोरील पुणे-अहमदनगर रोडलगत असणाऱ्या तोरणा हाॅटेल नजीक असलेल्या लाकडाच्या वखारीजवळ आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौतम (वय 23 वर्षे) हा राहत होता. 17 मे 2021 रोजी पहाटे पाचच्या सुमारास तो कोणालाही न सांगता निघून गेल्याने, त्याचा चुलत भाऊ अवनीश रामब्रिश कुमार याने रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीसांना संपर्क साधला व आशिष कुमार यांच्या बेपत्ता होण्याची खबर नोंदवली.
दरम्यान ही व्यक्ती बेपत्ता होतानाच चुलत भावाने काही संशयही व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांना देखील आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौतम याबाबत घातपात झाला असावा असा संशय वाढत गेला. याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांना दिल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सुचना करून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश धस यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहायक निरिक्षक सचिन काळे, महिला फौजदार देशमुख, हवालदार जनार्दन शेळके, पोलीस कर्मचारी राजु मोमीण, अजित भुजबळ, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, नंदा कदम, पुनम गुंड, मुकेश कदम यांचे तपास पथक नेमले.
रांजणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता प्रकरणाचा सखोल तपास करून दाखल गुन्हयातील संशयित आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवली. या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौैतम हा 17 मे 2021 रोजी पहाटेच्या वेळी इस्लाम बिस्मील्ला सम्मानी याच्या घरात आल्याचे इस्लाम सम्मानी व त्याचे मुलांनी पाहीले.
त्या गोष्टीचा राग आल्याने इस्लाम बिस्मील्ला सम्मानी याने मुलांच्या मदतीने त्याचा खुन केला. ही बातमी मिळाल्याने इस्लाम बिस्मील्ला सम्मानी (वय 41 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) यास ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली.
त्यावरून इस्लाम याने सांगितले की, दिनांक 17 मे 2021 रोजी पहाटे 02.45 वाजण्याचे सुमारास इस्लाम हा लघवीसाठी उठलेला असताना त्यास आषिशकुमार सुभाषचंद्रकुमार गौैतम हा इस्लाम सम्मानीच्या घरात आल्याचे दिसून. म्हणून त्याने त्याची दोन मुले अब्दुल व रियाज यांना उठवून त्या तिघांनी मिळून आषिशकुमार यास लाकडी दांडक्यांनी व लोखंडी राॅडने मारहाण करून त्यास जिवे मारले.
इस्लाम याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचा मुलगा रियाज इस्लाम सम्मानी (वय 20 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) यास ताब्यात घेवून दोन्ही आरोपी 1) इस्लाम बिस्मील्ला सम्मानी (वय 41 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे), रियाज इस्लाम सम्मानी (वय 20 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांना रांजणागाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. पुढील तपास रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व मदतनीस विलास आंबेकर हे करत आहेत.











