बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कांडेबिलासह दोनशे रुपये प्रति टन द्यावेत अशी मागणी आजी-माजी संचालकांनी केली असून या संदर्भात मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करू असा इशारा देखील दिला आहे.
कारखान्याचे संचालक सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण पाटील, रामदास आटोळे, विलास देवकाते, लक्ष्मण जगताप, अविनाश गोफणे, हर्षल कोकरे, मधुकर मुळीक, राजेंद्र जाधव, सुनील वाघ, राजेंद्र बुरुंगले, तानाजी पोंद्कुले आदींच्या उपस्थितीत यासंदर्भात कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले.
माळेगाव कारखान्याने आत्तापर्यंत मागील वर्षी देखील कांडे बिल दिलं नव्हते. ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने तातडीने कांडे बिल शंभर रुपये आणि उचल शंभर रुपये असे एकूण दोनशे रुपये प्रतिटन सभासदाला द्यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
सध्या कोरोना महामारी मुळे शेतकरी अडचणीत असून ऊस लागणी चा हंगाम सुरू होत आहे. अशा वेळेस मशागतीसह इतर खर्चाला शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे कारखान्याने स्वतःहून यामध्ये सभासदांना मदत करावी व लोकहिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी आजी-माजी संचालकांनी केली आहे.











