विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी कराव्यात व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार चौधरी यांनी केली.
पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पुणे-सोलापूर महामार्गा वरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हिंदुस्थान पेट्रोलीयम पंपावर मंगळवारी (ता. ०८) आंदोलन करण्यात आले. त्यावेळी वरील मागणी चौधरी यांनी केली. यावेळी हवेली तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवदास काळभोर आणि हवेली बाजार समितीचे माजी प्रशासकीय संचालक अशोक सावंत उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना चौधरी म्हणाले की, केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या होत्या. परंतु, काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर त्याचा परिणाम होवू दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या युपीए सरकारच्या काळातील किमती व सध्याच्या सरकारच्या काळातील किमतीशी तुलना करता, जवळपास ५० टक्के एवढ्या कमी असताना देखील मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केलेली आहे. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. त्यात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. असे चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये प्रतिलिटर टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये प्रतिलिटर झाले आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार जनतेला सहन करावा लागत आहे. तरी, सरकार शांत का बसले आहे. असा सवाल देखील उपस्थितांनी केला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत. यासोबत केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे हवेली तालुका युवक अध्यक्ष तुषार जवळकर, अल्पसंख्या शेलचे उपाध्यक्ष महम्मद भाई शेख, सरचिटणीस बाळासाहेब केदारी आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











