विशाल कदम: महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : पुणे शहरातील लोणीकंद आणि डेक्कन या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणार्या एका सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने हांडेवाडी (ता. हवेली) चौकातून अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.
सुनील दिलीप झरे (वय २१. रा. ससाणे वस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील रामदास गाडे (रा. वाघोली, ता. हवेली) हे त्यांच्या वाघोली येथील गॅरेजवर १० नोव्हेंबर २०२० रोजी काम करीत होते. टेंपोचालकाशी झालेल्या वादावरून सुनील झरे व त्याच्या साथीदारांनी सुनील गाडे व त्यांच्या दाजींना जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मारहाण करून पिस्तूलामधून दोन गोळ्या झाडल्या होत्या. तसेच त्यांनी वाहनांची मोडतोड करून दहशत निर्माण केली होती. यासंदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला पकडण्यासाठी पोलिस आयुक्त आमिताभ गुप्ता यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. आरोपीस पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, प्रमोद गायकवाड, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंखे, बाजीराव वीर, निखिल पवार, रोहिदास पारखे यांचे पथक तयार करण्यात आले.
सदर पथकातील हवालदार नितीन गायकवाड व दिगंबर साळुंखे यांना सुनील झरे हा ७ जून २०२१ रोजी हांडेवाडी चौकात येणार असल्याची माहिती एका खबर्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनूषंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. या सापळ्यात आरोपी सुनील अलगद अडकला.
आरोपीस पकडण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त नम्रता पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांचे विशेष सहकार्य मिळाले. दरम्यान, सुनील झरे याच्यावर पुणे शहरातील दोन पोलीस ठाण्याचे हद्दीत गोळीबार व खुनाचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला हांडेवाडी चौकातून अटक करून बेड्या ठोकल्या. लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला लोणी कंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.











