दिल्ली : महान्यूज लाईव्ह
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले. पंतप्रधानांनी ते गांभिर्याने समजून घेऊन यावर विचार करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात राज्यातील आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करावी अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही असे मत यावेळी अशोक चव्हाण यांनी मांडले.
दरम्यान राज्यातील पिक विमा योजना, मागासवर्गीयांचे बढती आरक्षण मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमील जागेची उपलब्धता , जीएसटी परतावा यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांपुढे विषय मांडले. त्याची माहिती घेण्याचे आश्वासन पंतप्रधांनानी दिले अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पंतप्रधानांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले असून ते सकारात्मक पध्दतीने हा विषय समजून घेतील अशी आम्हाला आशा असल्याचे ठाकरे म्हणाले.
मराठा किंवा ओबीसी किंवा कोणतेही आरक्षण असेल अथवा घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील यासंदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी व मार्ग काढावा असे अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान या चर्चेदरम्यान पंतप्रधानांपुढे राज्यपालांची भूमिका व राज्य सरकारपुढील अडचणी यांची माहिती देण्यात आली. राज्यपालांकडे दिलेल्या १२ आमदारांच्या निवडीच्या यादीवरही चर्चा यावेळी झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.











