शिरूर : महान्युज लाइव्ह
अवैध वाळू करणाऱ्या ट्रकवर कारवाई केल्यानंतर ट्रक मधील वाळू खाली करून महसूल पथकास दमदाटी करून पळून गेलेल्या व्यक्तीस सात महिन्यानंतर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
याबाबत सविस्तर असे की,दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास शिरूर तहसिल कार्यालयातील महसुल खात्याचे अधिकारी व पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन व चोरी यावर कारवाई करत असताना कारेगाव ता. शिरूर हद्दीत फलके मळा येथे हायवा ट्रक (नं. एम. एन. १२ क्यु. डब्ल्यु. ९९९५) हा पुणे नगर हायवे रोडने पुणे बाजुकडे जात असताना पथकाने हायवा ट्रक थांबवून पाहणी केली.
त्यामध्ये वाळु असल्याचे पथकाला आढळून आले होते. चालकास पावतीची मागणी महसुल खात्याचे पथकाने केली असता, चालकाजवळ पावती मिळून आली नाही. त्यावेळी महसुल खात्याचे पथकाने चालकास हायवा ट्रक रांजणगाव पोलीस स्टेशन येथे घेण्यास सांगितला,
महसूल खात्याचे पथक हायवा ट्रक रांजणगाव पोलीस स्टेशन च्या दिशेने घेवून जाताना आरोपी धीरज पाचर्णे हा त्याचेकडील स्विफ्ट कार नं. (एमएन १२ क्यु एम ००१२) मधून पाठीमागून आला व त्याने हायवा ट्रक थांबवून चालकास खाली उतरवून हायवा ट्रक मधील वाळू रोडचे कडेला हायवाचे हायड्रोलिकने खाली केली आणि महसुल खात्याचे पथकाने शासकीय कामात अडथळा आणून त्यांना दमदाटी करून चालकास घेवून निघुन गेला.
यानंतर हायवा ट्रक महसूल खात्याचे पथकाने रांजणगाव पोलीस स्टेशन येथे आणून लावला.याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपी धीरज जगन्नाथ पाचर्णे (वय ३० वर्षे रा. तर्डोबाचीवाडी, शिरूर ता. शिरूर) हा गुन्हा केल्यानंतर सुमारे सात महिन्यापासून फरार होता. सदरचा आरोपी हा शिरूर बायपास परीसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक निरीक्षक सचिन काळे, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, राजु मोमीण, मंगेश थिगळे यांनी केली आहे.











