इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरातील कोरोनाग्रस्त मायलेकींना ईसीजी, क्ष किरण तपासणी व रक्त तपासणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी चक्क इंदापूरमध्ये फिरवल्याची चर्चा सध्या सुरू असून या घटनेने इंदापूरकर घाबरले आहेत. प्रशासनाच्या या हलगर्जीपणास जबाबदार कोण हा प्रश्न विचारला जात आहे.
कोरोनाच्या रुग्णांसाठी इंदापूर खरोखरच योग्य आहे का हाच प्रश्न सध्या अनेकांना पडला असून पाठीमागे काही दिवसांपूर्वी खुद्द राज्यमंत्र्यांना देखील उपजिल्हा रुग्णालयाविषयी लोकांनी केलेल्या तक्रारीने हैराण केले होते. आता अत्यंत गंभीर संकटाला सहजपणे घेण्याच्या आरोग्य खात्याच्या कार्यवाहीने सामाजिक स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.
इंदापूरातील उपचार सुरू असलेल्या कोरोनाग्रस्तांची सोय खासगी वसतीगृहात करण्यात आली असून मंगळवारी या कोरोनाग्रस्तांची क्ष किरण तपासणी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात सुविधा नसल्याने एका खासगी दवाखान्यात नेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. वास्तविक कोरोनाग्रस्तांना उपचारादरम्यान संबंधित उपचारकेंद्रातून हलवले जाऊ नये यासाठी अगोदरच तेथे पुरेशी व्यवस्था उभारली जायला हवी. मात्र इंदापूर तालुक्यात तशी सुविधा कोरोनाग्रस्तांना ठेवलेल्या सीसीसी केंद्रामध्ये नाही, त्यामुळे सध्या शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच सुरू असलेल्या चर्चेने या अनास्थेला तोंड फोडले आहे.
इंदापूरात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची सोय सध्या खासगी ठिकाणी करण्यात आली आहे. इंदापूरात शासकीय वसतीगृहे आहेत, मात्र कोरोनाग्रस्तांची खासगी वसतीगृहाच्या ठिकाणी सोय केली असून त्या ठिकाणी पुरेशी यंत्रणा न उभारताच तेथे कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल केले आहेत. भविष्यात जर इंदापूरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली तर आरोग्य खाते नेमकी कशी तत्परता दाखविणार हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना खूप दक्षता घेतली जाते. मात्र इंदापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण म्हणजे जणू डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आहेत अशाच थाटात उपचाराची पध्दत सुरू असल्याची टिकाही केली जात आहे.
यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. दरम्यान यासंदर्भात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिरसोडी येथील रुग्णाच्या बाबतीत योग्य ती दक्षता घेतली जात आहे. आरोग्य खात्याच्या मानकानुसार सीसीसी केंद्रात या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सीसीसी केंद्रात काही सुविधांचा अभाव असल्यास त्यात सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहील, मात्र आता सर्वांनी प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटना चुकते, त्यामुळे पहिल्यांदा असे रुग्ण इंदापूरात उपचार घेत आहेत, पुण्यापर्यंत जाण्याची आवश्यकता भासू नये अशा दृष्टीने आम्ही उपचारात पाहत आहोत. काही चुका असतील तर त्या नक्कीच सुधारल्या जातील.
कृष्णा ताटे, माजी नगरसेवक इंदापूर – कोरोना रुग्ण हा क्वारंटाईन करून ठेवायला हवा, त्याची सुरक्षितता व इतरांचीही सुरक्षितता पाहायला हवी. मात्र प्रत्यक्षात रुग्णांना फिरवले जात आहे, हे अत्यंत गंभीर आहे. हे धोकादायक व घातक आहे, याची चौकशी झाली पाहिजे. या रुग्णांना बारामती किंवा पुणे येथे उपचारासाठी तातडीने नेले पाहिजे.











