विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधातून पत्नीने प्रियकरच्या मदतीने पतीचा खून केला. आणि पतीचा मृत्यू हा कोरोनाने झाल्याचा बनाव केला. परंतु लोणी काळभोर पोलिसांनी तपास केल्यानंनातर खरा प्रकार उघडकीस आला.
मनोहर नामदेव हांडे (वय-२७, रा. ऊरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याची पत्नी आश्विनी मनोहर हांडे (वय-१९, रा. ऊरुळी देवाची, ता.हवेली, जि. पुणे) आणि तिचा प्रियकर गौरव मंगेश सुतार (वय-१९,रा. उत्तमनगर, मंतरवाडी ता. हवेली जि.पुणे) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर हांडे याचे अश्विनीशी जानेवारीमध्ये लग्न झाले होते. मनोहर हांडे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र मनोहर हांडे यांचा २४ मे रोजी उरुळी कांचन येथे अचानक मृत्यु झाला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करुन तपास सुरु केला होता.
तपासादरम्यान, अश्विनी व गौरव यांचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध असून त्यातूनच घातपात झाला असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली असता, त्याने अश्विनीच्या मदतीने खुन केल्याची कबुली दिली. अश्विनीच्या लग्नाच्या आगोदरपसून गौरव आणि तिचे प्रेमसंबंध होते.
यामुळे त्या दोघांना मनोहरचा सारखा अडथळा येत होता. तो अडथळा कायमचा काढण्यासाठी गौरव याने अश्विनीला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. अश्विनीने झोपेच्या गोळ्या मनोहरला दुधातून दिल्या. गोळ्या खाल्यामुळे मनोहरला गाढ झोप लागली.
त्यानंतर अश्विनीने तिचा प्रियकर गौरव याला घरी बोलावून घेतले. आणि त्या दोघांनी मिळून मनोहर याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्या दोघांनी गोळ्यांचे पाकिट फेकून दिले. सदर गुन्हयाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे करीत आहेत.
दरम्यान, सदर गुन्हयामध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नसताना लोणीकाळभोर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजु महानोर, उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, कर्मचारी नितीन गायकवाड, शंकर नेवसे, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, प्रमोद गायकवाड, रोहिदास पारखे, दिगंबर साळुंके, निखील पवार, राजेश दराडे, बाजीराव वीर आणि शैलेश कुदळे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.











