निवडून येताच गावकारभाऱ्यांनी सोडवला १०१ दिवसांत खंडोबावाडीचा पाणी प्रश्न…
महेश तुपे, शहाजीनगर
असंख्य आश्वासनं देऊन निवडून येणाऱ्या अन निवडून येताच आश्वासनावरून कोलांटी उडी मारणाऱ्या राजकारण्यांची आपल्याकडे कमी नाही, मात्र भोडणी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीत विद्यमान सत्ताधारी सरपंच, उपसरपंच व सदस्य याला अपवाद ठरलेत. निवडून येताच ११ वर्षे प्रलंबित असलेला खंडोबावाडीचा पाणी प्रश्न अवघ्या १०१ दिवसात निकाली काढण्यात गावकारभाऱ्यांना यश आले आहे.
भोडणीपासून अडीच किलोमीटरवर वसलेली खंडोबाचीवाडी. बाजूलाच रेडा – लाखेवाडी – भोडणीच्या वेशीवर उभा असलेला निरा-भीमा सहकारी साखर कारखाना! कारखान्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार, व्यवसाय आणि आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यास मदत झाली. लोकांचं जीवनमान बदलत होतं, मात्र पाण्यासाठीची वणवण सुरूच होती. अशातच २००२ साली भोडणी ग्रामपंचायतीने शेटफळ तलावातून खंडोबावाडीसाठी जलवाहिनी मंजूर केली.
त्यामुळे काही अंशी पाणीप्रश्न मिटण्यास मदत झाली, मात्र तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे या जलवाहिनीचं नियोजन कोलमडलं. अशातच निरा-भिमा कारखान्याच्या जलवाहिनीतुन खंडोबावाडीला आठवड्यातुन २ दिवस पाणी पुरवठा करण्यात येऊ लागला. दरम्यानच्या काळात अनेक राजकारण्यांनी “खंडोबावाडीला कायमस्वरूपी पाणी देऊ” एवढ्याच आश्वासनावर निवडून येत सरपंच पदापर्यंत मजल मारली.
पण पाणीप्रश्नाचं घोंगडं तसंच भिजत राहिलं. नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती अन वणवण सुरूच होती. दोन पिढ्यांनी सोसलेला पाण्याचा वनवास तिसरी पिढीच्याही नशिबी आला होता. २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे भोडणीत ‘विकास’ या नव्या समिकरणातून सत्ता स्थापन झाली. नव्या जोमाने विकासकामांना प्राधान्य देण्यात येऊ लागले. अशातच खंडोबाचवाडीच्या नागरिकांची पाणी वेळेत येत नसल्याची तक्रार ग्रामपंचायतीत येऊन धडकली. लागलीच सत्ताधाऱ्यांनी थेट शेटफळ तलाव गाठत पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांची चाचपणी केली. आणि अखेर ठरलंच.
१० वर्षांपूर्वी बंद पडलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करायची, शेटफळ तलावातील विहिरीच्या स्वच्छतेसह विहिरीतील पाणीउपसा यंत्राला स्वयंचलित (अॅटो) यंत्राद्वारे नियंत्रित करायचे सर्वानुमते ठरले. अन लागलीच संतोष जगताप, मल्हारी लोखंडे, अनिल शिंदे, प्रशांत गोसावी, सुनिल पवळ, ग्रामपंचायत शिपाई नामदेव पवार यांच्यासह सुनिल तुपे, विकास डोंगरे, सचिन पवळ, मोतीराम शिंदे असे गावातील सुजाण नागरिकही या मोहिमेत सहभागी झाले.
महिला सदस्यांचे पतीराजही स्वतः टिकाव अन खोरे घेऊन झटू लागले. वाटेतील असंख्य अडथळ्यांना खुलेआम भिडत १४ दिवसांच्या संघर्षानंतर जलवाहिनीची दुरुस्ती झाली. खंडोबावाडीत पाणी आले. प्रत्येक घराला अर्धा इंच पाण्याची जोडणी देण्यात आली. प्रत्येक घराला पाणी मिळत होतं.
वाडीला आलेल्या पाण्याचा आनंद दिवाळी- दसऱ्यापेक्षा कमी नव्हता. दोन पिढ्यांनी सोसलेला पाणी प्रश्न आता कायमस्वरूपी निकाली निघाला होता. जुन्या जाणत्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओसंडून वाहत होते. डोळ्यातून वाहणारं पाणी सुध्दा म्हणत होतं “वाडीला पाणी आलं….”











