औदुंबर क्षीरसागर : महान्यूज लाईव्ह
करमाळा : करमाळा तालुक्यातील जातेगाव हद्दीत मागील काही दिवसांपासून स्थानिक वाळू माफिया वाळूची चोरी करून चोरट्या पद्धतीने वाहतूकीचा सपाटा लावला होता. करमाळा पोलिसांनी वाळू वाहने अडवून ती ताब्यात घेऊन संबंधित वाहनांवर गुन्हा दाखल केला आहे.
ही माहिती करमाळा पोलिसांनी दिली. जातेगाव हद्दीतीत बेकायदा वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून करमाळा जातेगाव रोडवर बेकायदा वाळू वाहतूक चोरट्या पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी एक ट्रॅक्टर व ट्रॉली पकडली, मात्र ट्रॅक्टरचालक अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला.
पोलिसांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्राली तीन ब्रास वाळू असा एकूण 6 लाख 30 हजार ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल विलास ओमासे यांनी फिर्याद दिली, त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











