मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्याला कोरोना आटोक्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला असून, ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांवर आला आहे आणि ऑक्सिजन साठीचे बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहेत, अशा जिल्ह्यांना पूर्णपणे अनलॉक केले जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे असून, औरंगाबाद, भंडारा, धुळे, गडचिरोली, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, गोंदिया, लातूर, नागपूर, नांदेड व नाशिक या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. या जिल्ह्यामधील सर्व रेस्टॉरंट, मॉल, दुकान आणि रेल्वे देखील सुरू होतील. लग्न सोहळ्यासाठी दोनशे लोकांची परवानगी राहील तर खाजगी व सरकारी कार्यालय 100% सुरू राहतील. येत्या चार जून पासून हा टप्पा सुरू राहिल.
दुसरा टप्पा हा जिथे कोरोना चा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आसपास असेल. ज्या जिल्ह्यातील ऑक्सिजनचे बेड 25 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान भरलेले असतील, अशा जिल्ह्यांमध्ये दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असून तेथील निर्बंध अंशतः शिथिल केले जाणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात ज्या ठिकाणी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर दहा ते वीस टक्क्यांच्या आसपास असेल आणि येथील सर्व दवाखान्यामधील ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या आसपास भरलेले असतील. अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
उर्वरित सर्व जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. अर्थात राज्यात दुसऱ्या आणि त्यानंतरच्या पाचव्या टप्प्यापर्यंत जमावबंदी मात्र लागू राहील. मात्र प्रत्येक जिल्ह्यामधील पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनची आवश्यकता यावरच त्या जिल्ह्यांचा टप्पा ठरेल. ज्या ठिकाणी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा 10 ते 20 टक्के आहे आणि जेथे ऑक्सिजनचे बेड हे 60 टक्क्यांच्या वर भरलेले आहेत, अशा जिल्ह्यांसाठी चौथा टप्पा; तर जिथे पॉझिटिव्हिटी दर हा वीस टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजनचे बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात भरलेले असतील, अशांसाठी पाचवा टप्पा असेल आणि चौथा आणि पाचवा टप्पा लवकर अनलॉक होणार नाही.











