माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – सासवड आणि भोर हद्दीत अनेक सुरू असलेले बेकायदेशीर धंदे पोलिस पथकाच्या मार्फत मोडीत काढले जात आहेत. अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी निडरपणे पोलिसांना कळवावे. त्यांची नावे गुप्त ठेऊन तातडीने कारवाई केली जाईल. कोणतेही अवैध धंदे चालू देणार नाही असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी दिला.
एका गंभीर गुन्ह्याच्या चौकशीकरिता नसरापूर ( ता. भोर ) येथील राजगड पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल सोमेश राऊत आणि श्रीकांत वढणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी भोर पोलिसांच्या मदतीने कारवाई करून भोर शहरात संबधित अवैध धंदे करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला.
भोर शहरमध्ये साठेनगर व पिराचामळा येथे नुकतीच गावठी धंद्यावर अचानक छापा टाकून कारवाई करण्यात आली. यामध्ये साठेनागर येथील स्मशानभूमी जवळ गावठी दारू विक्री करताना अमित प्रकाश तारु ( रा. भोईआळी ), महेश सीताराम बांदल ( रा. गोकवडी ) व भिमाजी शांताराम भिलारे आढळून आले. पोलिसांनी पंचाच्या समोर पंचनामा करून तिघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. पीराचा मळा येथे देखील गावठी दारू विक्री करणाऱ्या हनुमंत सोपान मळेकर याला ताब्यात घेऊन भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. येथे १०० लिटर हून अधिक गावठी दारू जप्त केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, हवालदार सुभाष गिरे, महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम, सोमेश राऊत, अनिल हिप्परकर, श्रीकांत वढणे आदींनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. दरम्यान शहरातील भोर पोलिसांनी देखील बेकायदेशीर धंदे उधळून लावत धडक कारवाई केली.











