विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह अष्टापूर व परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पडलेल्या पावसामुळे शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांना याचा लाखो रुपयांचा फटका बसला. तर ३०० पेक्षा जास्त कोंबड्यांना आपले प्राण गमवावे लागले.
अष्टापूर येथील पोल्ट्री व्यावसायिक माणिक कोतवाल यांच्या पोल्ट्रीवरील सिमेंटचे पत्रे उडून सुमारे ५०० फूट अंतरावर जाऊन पडले. यामुळे त्यांचे सुमारे चार लाखापेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कैलास कोतवाल यांच्या घरातील पत्रे उडून सुमारे १५०० फूट अंतरावर जाऊन पडले. तसेच गावातील जुन्या घराच्या भिंतीसुद्धा पडल्या आहेत.
शिरसवडी येथील दिनेश कोतवाल यांच्या ३०० पेक्षा जास्त कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पोल्ट्रीफार्मचे पत्र्याचे शेडही उडून गेले आहे. त्यांचे सुमारे तीन लाखापेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कोरेगाव मूळ येथील गोळीबार मैदान परिसरातील महालक्ष्मी कॉलोनीमध्ये सहा घरांचे पत्रे उडुन गेले आहेत. तर एका लहान मुलाच्या डोक्यात विट पडुन किरकोळ दुखापत झाली आहे. यामुळे वादळी वाऱ्यासह पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पूर्व हवेलीत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह दीड तास गारपीट झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मडून पडली होती. तर काही भागात वीजपुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली आहे. मान्सूनपूर्व पाऊस हा मशागतीसाठी चांगला झाला आहे. परंतु, गारपिटीमुळे शेतातील मका, पालक, मेथी, कोथिंबीर व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
आमदार अशोक पवार : मान्सूनपूर्व पडलेल्या पावसामुळे हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे, पोल्ट्री व्यावसायिकांच्या शेडचे आणि नागरिकांच्या घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार हवेली तालुक्यात नुकसानग्रस्त नागरिकांचे त्वरित पंचनामे करण्यात येणार आहेत. आणि पंचनामे केलेला अहवाल कृषी आयुक्तालयात सादर केल्यानंतर प्रशासनाकडून नुकसान ग्रास्थांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.











