मुंबई महान्यूज लाईव्ह
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व खासदार संभाजीराजे यांच्यात मराठा आरक्षणाच्या मार्गावरून मतभेद असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याने त्यांना भाजपमधूनच विरोध होऊ लागला असून राणे कुटुंबियांनी देखील त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे, त्यात आता खुद्द प्रदेशाध्यक्षांचीच भर पडली आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून संभाजीराजे भाजपमध्ये एकाकी पडल्याचेच चित्र दिसत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंच्या मागणीला पाठिंबा आहे, मात्र ते जे बोलले, ते आम्हाला मान्य नाही. त्यांची कृती सरकारला सहकार्याची असेल, तर ती कदापि मान्य नाही. कोरोना आहे म्हणून शांत बसण्याची त्यांची भूमिका योग्य नाही, सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घ्यायची तयारी असेल, तरच आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे पाटील म्हणाले.
एकंदरीत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या विरोधात लढायचे हीच भाजपची भूमिका असून आरक्षण आणि कोरोनाचा काही एक संबंध नाही असे पाटील म्हणाले.











