तक्रारदाराने पोलीस ठाणे गाठताच प्रकरण आपापसात मिटवले
नगर : महान्यूज लाईव्ह
कर्जत : नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोरोनाच्या महामारी चा गैरफायदा घेत सावकारांचे पीक फोफावले आहे. मनमानी पद्धतीने सावकार सामान्य शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना अव्वाच्या सव्वा दराने कर्ज देऊन, त्यांच्याकडून भरमसाठ व्याजाची मागणी करत आहेत. अशाच एका सावकाराला कर्जत तालुक्याची पोलीस ठाण्याची फक्त पायरी दिसली आणि पुढे काय घडणार आहे याची कल्पना येताच त्याने कर्जदाराच्या हातापाया पडून प्रकरण मिटवले.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विना परवाना खाजगी सावकारकीचे नवनवीन किस्से आता कर्जत पोलिसांच्या आवाहनामुळे समोर येऊ लागले आहेत. मनमानी व्याजाचे दर ठरवून संबंधितांकडून अव्वाच्या-सव्वा रक्कम वसुल करायची, कधीकधी तर घेतलेल्या रकमेपेक्षा तिप्पट-चौपट रक्कम देऊनही जमिनीचे खरेदी खत नावावर करून घ्यायचे किंवा स्वाक्षरी करून घेतलेले धनादेश वटवायचे अशा अनेक घटना घडत आहेत.
असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला. राशीन येथील किराणा दुकानदार रामभाऊ (नाव बदलले आहे) याच्याकडुन तक्रारदार विजय निंभोरे, (रा.राशीन) यांनी सन २०१४ साली ५ टक्के व्याजदराने १ लाख रुपये घेतले होते. रक्कम देण्यापूर्वी बँकेचा एक धनादेशही घेतला. पैसे देण्यासाठी मध्यस्थी आणि वेळोवेळी व्याजाचे पैसे आणण्यासाठी आणखी एकजण जानभरे वस्ती, राशीन येथील सहभागी होता.
तक्रारदाराने जून २०१४ ते एप्रिल २०१८ पर्यंत प्रतीमहिना ५००० रुपयेप्रमाणे २ लाख ३० हजार एवढी रक्कम दिली, मात्र तरीही सावकाराने ऑगस्ट २०१८ साली घेतलेल्या धनादेशावर ३ लाख रुपये टाकून धनादेश वटवला. खात्यात रक्कम नसल्याने चेक बाऊन्स झाला. त्यावरून सावकाराने कोर्टात चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल केला.
ही केस एप्रिल २०२१ पर्यंत न्यायालयात चालु होती. एवढी मोठी रक्कम व्याजापोटी देऊनही आणखी ३ लाख रुपयांचा तगादा लावल्याने तक्रारदार निंभोरे यांनी कर्जत पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याअगोदर सावकारकीची प्रकरणे हाताळून नागरिकांना न्याय मिळवून दिला होता.
तक्रारदार पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले असता, आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार या धास्तीपोटी संबंधित खटला न्यायालयातून मिटवून घेत सदरचा व्यवहार सावकाराने परस्पर मिटून घेतला. सध्या कर्जत पोलिसांच्या धास्तीने अनेक प्रकरणे आपापसात मिटवून घेतली जात आहेत. तक्रारदार विजय निंभोरे आणि कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आभार मानले.
नागरीकांनो, कुणालाही न घाबरता पुढे या!
दरम्यान यासंदर्भात कर्जतची पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले, तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या सावकारकीच्या जाचाला कंटाळून अनेक कुटुंबे धुळीस मिळत आहेत. अशा प्रकरणातून अनेक अनुचित प्रकारही घडतात. त्यामुळे नागरिकांनी कुणालाही न घाबरता कर्जत पोलिसांकडे याबाबत तक्रार द्यावी. त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील.











