बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती मध्ये काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये 751 जणांची तपासणी झाली. त्यामध्ये 120 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये बारामती तालुक्यातील 114 जणांचा समावेश आहे. अर्थात त्यातही ग्रामीण भाग अजूनही रुग्ण संख्येच्या बाबतीत अधिक असून, ग्रामीण भागात तब्बल 71 जण तर शहरामध्ये 43 जण कोरोना बाधित आढळले आहेत!
तालुक्यातील मृत्युचे प्रमाण देखील आता हळूहळू कमी झाले आहे. शासकीय आकडेवारीनुसार काल फक्त तिघा जणांचा मृत्यू झाला! एरव्ही 24 तास धडाडणाऱ्या चिता पाहून रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या देखील हृदयात धडकी भरत होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच मृत्यूचे प्रमाण देखील आता कमी होऊ लागले आहे. पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर बेड मिळू लागल्याने रुग्णांवरील उपचार वेळेतच होऊन रुग्ण बरे होत आहेत हाच याचा परिणाम मानला जात आहे.
बारामतीत परवा 99 जण कोरोना बाधित आढळून आले होते, तर आज 114 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. संख्या कमी जास्त होत असली तरीदेखील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे हे मात्र नक्की!











