बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील पिंपळी येथे धक्कादायक घटना घडली. एका आईने रागाच्या भरात आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत 2 वर्षीय मुलगा व 4 वर्षीय मुलीचा जीव गेला. या घटनेत आई वाचली. मात्र हकनाक दोन्ही मुलांचा जीव गेला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रागाच्या भरात पतीसोबत झालेल्या वादानंतर आईने हे कृत्य केले. परंतु यामध्ये शौर्य अतुल सूर्यवंशी व दिव्या अतुल सूर्यवंशी चिमुकल्यांचा मात्र बळी गेला. बारामती तालुक्यातील पिंपळी येथील अतुल सूर्यवंशी व अंजली सूर्यवंशी या पती-पत्नीमध्ये काही कारणाने वाद झाला. या रागाच्या भरात अंजली सूर्यवंशी या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. आज पहाटे तीन वाजता ही घटना घडली.
दोन व चार वर्षाची मुले पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आज पहाटे तीन वाजता अंजली सूर्यवंशी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी पाण्यात उडी मारल्याने त्यांच्यापाठोपाठ मुले ही पाण्यात पडली. अंजली सूर्यवंशी यांना त्यांचे पती अतुल सूर्यवंशी यांनी पाण्याबाहेर काढल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अर्थात गावात मात्र वेगळी चर्चा सुरू असून, मुलांसह या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान आज पहाटे ही घटना घडल्यानंतर पीएमडी या दूध प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या तळ्यात या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर वाचवा वाचवा असा गलका आल्यानंतर छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण आणि या महिलेचे पती अतुल सूर्यवंशी यांच्यासह दूध डेअरी मधील कर्मचाऱ्यांनी यामध्ये मदत कार्य केले.
संतोष ढवाण आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या महिलेला वाचवण्यात यश आले. त्यानंतर या महिलेस आणि तिच्या दोन्ही मुलांना घेऊन बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालय गाठले. या दरम्यान दोन्ही मुलांचा मात्र अंत झाला होता.











