जेजुरी : महान्यूज लाईव्ह
यास चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन राज्यभर पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभाग वर्तवत असतानाच आज मात्र वाल्हे परिसरात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या वादळी वाऱ्याने अनेक घरे, गोठ्यांचे नुकसान झाले तसेच झाडे उन्मळून पडली.
वाढले परिसरात उभी पिके वादळी वाऱ्यामुळे झोपली तसेच आडाचीवाडी परिसरातील अंजीर, सीताफळ, चिकू, लिंबाच्या फळबागांचे देखील नुकसान झाले. मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व तातडीने पंचनामे व्हावेत अशी मागणी येथील शेतकरी प्रकाश पवार, निलेश पवार, सूर्यकांत पवार, संभाजी पवार, कैलास पवार, ओम पवार, विलास पवार आदींनी केली.
वाल्हे गावात दिनेश कुंभार, कैलास भुजबळ, बाळासाहेब भुजबळ यांच्या घरावरील पत्रे उडाले व घरांचे नुकसान झाले. त्याप्रमाणे गावातील काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे देखील नुकसान झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे अनेक विद्युत खांब वाकल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.











