सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पडस्थड मधील पांडुरंग मारकड यांनी माडग्याळ जातीच्या 3 मेंढ्या व 4 नर कोकरे खरेदी केली आहेत. ती देखील चक्क एक दोन लाखाला नव्हे, तर तब्बल 11 लाख 11 हजार रूपयांना! विशेष म्हणजे त्यामधील एका नर वाणाच्या अवघ्या 4 महिने वयाच्या कोकरास मारकड यांनी चार लाख रुपये मोजले आहेत. त्यामुळे पडस्थळच्या पांडुरंग मारकड यांनी खरेदी केलेल्या माडग्याळची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
गरिबांची गाय म्हणून ग्रामीण भागात जसे शेळीला महत्त्व आहे, तसंच धनगर समाजाची लक्ष्मी म्हणून मेंढीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंदापूर तालुक्यात मेंढी पालन हा धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय जरी नसला तरी आजही काही धनगर बांधवांच्या दारामध्ये ही लक्ष्मी आवर्जून पहावयास मिळते. त्यातच मेंढीच्या अनेक जातींपैकी कमी काळात लाखो रुपये मिळवून देणारी मेंढी म्हणून माडग्याळ जातिकडे पाहिले जाते.
अशात हजार दोन हजार नव्हे तर चक्क लाखो रूपये किंमतीची अगदी दोन चार महिने वयाची मोजकी माडग्याळची कोकरे इंदापूर तालूक्यात पहायला मिळाली तर ते नवलंच म्हणावे लागेल! इंदापूर तालुक्यातही या लाखो रुपये मिळवून देणाऱ्या आणि आपली लक्ष्मी समजली जाणाऱ्या या माडग्याळ मेंढी पहायला मिळाली.
याबाबत ‘महान्यूज’शी बोलताना पांडुरंग मारकड म्हणाले की, धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मेंढीपालन आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून तो चालत आलेला पारंपारिक व्यवसाय आहे. त्यामुळे आम्ही त्याकडे आमची लक्ष्मी म्हणून पाहतो. मेंढी ही केवळ मांसाहारासाठी विकली जात नसून अनेक प्रकारे विविध पैलूंनी उपयोगी आहे. यामुळेचं अल्प काळात तिच्या किमती अनेक पटीने वाढल्या आहेत.
सांगोल्यातील मेटकरी कुटुंब या व्यवसायात राज्यात प्रसिद्ध आहे आणि माडग्याळ ही जात देशात प्रसिद्ध आहे म्हणूनचं खरेदीवेळी तीची किंमत न पाहता वाण पाहिला. मेंढीमध्ये गाय, म्हैस व शेळीच्या तुलनेत कमी प्रतीच्या चाऱ्याचे सेवन करून त्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता जास्त असते. आर्थिक अडीअडचणीत तातडीने उत्पन्न देणारे मेंढीपालन इतर कोणत्याही पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत किफायतशीर असून विशेषतः दुष्काळी शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देऊ शकते.
या मेंढीच्या पिल्लाची किंमत दिवसागणिक वाढत जाते. या जातीच्या मेंढ्यांचा पांढरा रंग व त्यावर तपकिरी रंगाचा भाग, फुगीर नाक, लांब पाय, निमुळती व लांब मान अशी वैशिष्ट्ये असून शिंगे नसलेली ही मेंढी, काटक व अवर्षण स्थितीत टिकाव धरून राहण्याची क्षमता असलेली आहे. आतापर्यंत दोन महिन्याचे पिल्लू 10 लाख 5 हजार इतक्या उच्च किमतीला विकले गेले असल्याचे मेंढपाळ बंडु मेटकरी व तानाजी मेटकरी यांनी सांगितले.











