दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाई : शिरगाव (ता. वाई) येथील इलेक्ट्रोपॅथी व निसर्गोपचार पदविका असलेल्या डॉक्टरची शैक्षणिक पात्रता वैद्यकीय सेवेमध्ये समाविष्ट होत नसल्याने भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी उज्वला इंगळे यांनी या डॉक्टरला रुग्णांवर उपचार करता येणार नाहीत त्यामुळे तुमचा वैद्यकीय व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावा व सदरचा व्यवसाय बंद न केल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल अशी ताकीद देऊन लेखी नोटीस बजावली आहे.
सविस्तर वृत्त असे की शिरगाव ता. वाई येथील ग्रामपंचायतीचे सरपंच उज्वला नितीन भोसले यांनी त्यांच्या गावामध्ये डॉ. महेश नामदेव शिंदे हे वैद्यकीय व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे अधिकृत अशी वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी आवश्यक अशी कागदपत्रे नसल्याची आमची खात्री असून ते येथील विविध प्रकारच्या रुग्णांवर बेकायदेशीररित्या औषधोपचार देऊन इलाज करीत आहेत असे पत्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते.
यामध्ये संबंधित डॉक्टर करत असलेल्या या वैद्यकीय व्यवसायामधून एखाद्या वेळेस गावातीलच रुग्ण दगावू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. यामध्ये ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्या सहीने भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर उज्वला इंगळे यांनी येथे सुरु असलेल्या महेश शिंदे यांची आवश्यक वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी कागदपत्रे तपासावीत व बोगस सापडल्यास त्यांचा येथे असलेला दवाखाना तत्काळ बंद करण्यात यावा अशी तक्रार नमूद केली होती.
यावरून भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी इंगळे यांनी या पत्राची आणि तक्रारीची गंभीर दखल घेवून डॉ. महेश शिंदे यांच्या दवाखान्याला अचानक भेट दिली व त्यांच्याकडील वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. डॉ. महेश शिंदे यांनी दाखविलेल्या कागदपत्रामध्ये इलेक्ट्रोपँथी महाराष्ट्र टिळक विद्यापीठ पुणे तसेच योग व निसर्गोपचार पदविका अशी कागदपत्रे त्यांनी दाखवली.
पण डॉ. इंगळे यांनी सदरची पदवी वैद्यकीय सेवांमध्ये समाविष्ठ होत नसल्याने आणि तालुका आरोग्याधिकारी पंचायत समिती वाई व जिल्हा आरोग्याधिकारी सातारा यांनी वरील व्यवसाय करीत असलेल्या डॉक्टरला कोणताही वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारा अधिकृत परवाना दिला नसल्यामुळे शिंदे यांना वैद्यकीय सेवा नागरिकांना देता येत नाही असे सुनावले व आपण सुरु केलेला वैद्यकीय व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावा असे लेखी आदेश डॉ. इंगळे यांनी दिले.











