मुंबई- महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या महासंकटात नियमित वेळेपर्यंत हे संकट रोखले गेले नाही व शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत, तर राज्यातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी डिजीटल क्लासरुम सुरू कराव्या लागतील. त्यासाठीची प्रणाली विकसीत करा असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शालेय व उच्च तंत्रशिक्षण विभागास दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नव्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. यामध्ये सद्यस्थितीत शिक्षणाची नवी प्रणाली सुरू करण्याबाबत नियोजन करावे लागेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोनाचे संकट पावसाळ्यापूर्वी संपणार नाही असे चित्र दिसत असेल तर जूनमध्ये शाळा सुरू होतात, त्यांचे काय अशी पालकांमध्ये चिंता होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शालेय व उच्च तंत्रशिक्षण विभागास शाळा सुरू झाल्या नाही, तरी शिक्षण मात्र सुरूच ठेवावे लागेल असे स्पष्ट केले. त्यासाठी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत, तर ऑनलाईन शिक्षण, डिजीटल माध्यमांचा वापर करावा लागेल, शहरी भागात ऑनलाईन शिक्षणाच्या प्रणालीचा पर्याय वापरावा लागेल असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. कोरोनाने सर्वच घटकांना प्रभावित केले असले तरी मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी शैक्षणिक आराखडाही त्या स्वरुपाचा तयार करावा असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.










