बारामती : महान्यूज लाईव्ह
दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत आहे, या निमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने 26 मे रोजी देशव्यापी शेतकरी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला देशातील राष्ट्रवादी व शिवसेनेसह 12 प्रमुख पक्षांनी समर्थन दिले आहे.
दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी नोव्हेंबर 2020 पासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश सह महाराष्ट्रातील शेतकरीही सहभागी झालेले आहेत. दिल्लीच्या विविध हद्दीवर हे शेतकरी अजूनही थांबून आहेत. या शेतकऱ्यांनी आता संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून 26 मे रोजी देशव्यापी शेतकरी आंदोलनाची हाक दिली आहे.
या आंदोलनाला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक व आर जे डी या 12 विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. या बारा पक्षांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निवेदन दिले आहे.











