जोडीदार समजून भावावर जीवघेणा हल्ला, तिघांवर अॅट्रोसीटी! दौंड तालुक्यातील पाटस स्टेशन कानगाव येथील घटना…
राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील कानगाव ( पाटस रेल्वे स्टेशन ) परिसरात साहित्याची चोरी केल्याच्या आरोपावरून दोन वर्षांपासून तुरूंगात गेलेल्या आरोपीला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर रजा मिळाली. रजा मिळाल्यानंतर दोनच दिवसात चोरीतील आपला सहकारी जोडीदाराला जामीन मिळाला आणि मला मिळाला नाही, याचा राग मनात धरून पाटस रेल्वे स्टेशन आणि कानगाव परिसरातील मित्रांच्या मदतीने हल्ला केला. दुर्दैवाने जोडीदार समजून त्याच्या मोठ्या भावावर हा हल्ला जातीवाचक शिवागाळ करीत लोखंडी गज आणि तीक्ष्ण हत्यारांनी केला.
याप्रकरणी तिघांवर जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी अॅट्रोसिटी आणि जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान यात आणखी एक योगायोग असा की, फिर्यादीचे वडील हे संगमब्रीज रेल्वेस्टेशनला पोलीस हवालदार आहेत तर जेलमधून पॅलेरवर आलेल्या आरोपीचे वडीलही रेल्वे गेटमेन आहेत.
पंकज दिलीप निमजे (रा.दौंड,पुर्ण पत्ता माहित नाही.) , अनिल गणपत चौधरी (रा.कानगाव ) व रमेश अरविंद गाडेकर ( रा.होळकरवाडी कानगाव ता.दौंड.जि.पुणे ) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी पंकज दिलीप निमजे आणि प्रतिक सुनिल सोनवणे रा.पाटस स्टेशन (कानगाव) या दोघांनी 2019 मध्ये रेल्वेस्टेशन हद्दीत चोरी केली होती.
यातील प्रतिक याला या गुन्हयात जामीन मिळाला तर पंकज याला जामीन न मिळाल्याने त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली. 19 मे 2021 ला पंकज यास कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पॅरोलची रजा मिळाल्याने तो दौंड आला होता. पंकज याचे वडील दिलीप निमजे हे पाटस रेल्वे स्टेशनला गेटमेन म्हणून कामगार आहेत. पंकज याने त्याचे कानगाव येथील मित्र अनिल चौधरी आणि रमेश गाडेकर यांना बोलावून आपल्या सहकारी आरोपी मित्राला जीवे मारण्याचे प्लॅनिंग केले.
21 मे रोजी सकाळी गणेश हा घरापासून अर्धाकिलोमिटर अंतरावर गार रोडला व्यायाम करण्यासाठी गेला असता, या तिघांना हाच प्रतिक असल्याचे वाटून त्यांनी गणेश याला जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी गजांनी मारहाण करण्यास सुरवात केली. नंतर हा प्रतिक नसून त्याचा भाऊ गणेश असल्याचे लक्षात आल्याने या आरोपींनी तुझ्या भावाला फोन करून बोलावून घे त्याला जामीन मिळाला आणि मला जामीन मिळाला नाही त्याला मारायचे आहे. अशी दमदाटी करीत मारहाण केली.
गणेश याने त्यांच्या तावडीतून सुटका करीत पळ काढून घर गाठले आणि घडलेला प्रकार आईवडीलांना सांगितला. याबाबत गणेश सोनवणे याने यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने आरोपींवर जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी अॅट्रोसिटी आणि जबर मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. 21) गुन्हा दाखल करण्यात आला.
पाटस पोलीस चौकीचे फौजदार संजय नागरगोजे, पोलीस हवालदार सागर चव्हाण, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, संजय देवकाते, अमित यादव, समीर भालेराव,विजय भापकर,हनुमंत खडके, होमगार्ड पप्पू नानवर आदी आरोपींना पकडण्यासाठी गेले असता पोलीसांना पाहताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत ऊसाच्या शेतात पळ काढला, मात्र पोलीसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले.
पोलीसांनी आरोपींना बारामती सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे फौजदार संजय नागरगोजे हे तपास करीत आहेत.











