विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : पूर्व हवेलीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरोग्य विभागाकडून लसीकरणाचा वेग वाढविला आहे. परंतु मागील दोन आठवड्यांपासून कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे लसीकरण त्वरित सुरु करावे अशी मागणी सोरतापवाडी (ता. हवेली)च्या सरपंच संध्या चौधरी यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे येथील शासकीय विश्रामग्रहात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सोरतापवाडीच्या सरपंच संध्या चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२१) निवेदन देण्यात आले. यावेळी अमित चौधरी आणि ग्राम विकास अधिकारी संतोष नेवसे उपस्थित होते. या चर्चेत कोरोना लसीकरणाचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे. तसेच गावातील विविध विकासकामांना गती देणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी त्यावेळी सांगितले.
दरम्यान, सोरतापवाडी हे गाव कोरोनाच्या “हॉट स्पॉट”मध्ये (अतिदक्षता विभागात) डॉ. राजेश देशमुख यांनी ७ मे च्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. यामुळे येथील नागरिकांचे लसीकरण १०० टक्के होणे गरजेचे आहे. तरी, या गावाचे लसीकरण त्वरीत चालू करण्यात यावे. असे या निवेदनात म्हटले आहे. सोरतापवाडी उपकेंद्रांतर्गत सोरतापवाडी, नायगाव ,पेठ आणि प्रयागाधाम या गावांचा समाविष्ट आहे.











