बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील जळोची गावात राहणाऱ्या ढाळे कुटुंबावर नियतीने मोठा आघात केला काही दिवसांपूर्वी आईला कोरोना कोरडा झाला आणि त्या उपचारादरम्यान आईचा मृत्यु झाला त्यामुळे इंदापूर तालुक्यातील रेडमी गावातून आलेल्या मुलीचा काल विषारी साप चावून मृत्यू झाला. या दुहेरी संकटाने ढाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
काही दिवसांपूर्वीच आई सौ. सरूबाई बंडा ढाळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, सांत्वनासाठी त्यांची मुलगी सौ.मनीषा ठोंबरे या रेडणी, (ता. इंदापूर, जिल्हा – पुणे) या ठिकाणाहून जळोची गावात आल्या होत्या. काल जळोची तील या माहेरच्या घरी त्या झाडलोट करत असताना त्यांच्या पायाला पिठाच्या गिरणी जवळील जागेतून डोकावणाऱ्या सापाने दंश केला.
सापाची शेपटी मनीषा यांनी पाहिली, त्यानंतर घरातल्या सर्वांनी सापाचा शोध घेतला. मात्र साप सापडला नाही आणि मनीषा यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. परंतु सगळीकडे कोरोनाचे रुग्ण असल्याने तातडीचे उपचार होण्यास उशीर झाला. त्यांचा त्रास वाढला आणि उपचारादरम्यान काल सकाळी 10.30 वाजता मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना जळोची येथून त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले.
त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास कुटुंबियांना त्याच जागेवर वाँशिंग मशिन जवळ फरशी खाली जाताना एक साप दिसला, त्यांनी बारामती येथील ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधव यांना साप पकडण्यासाठी फोन केला. सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी पोहचले व त्यांनी फरशी खाली लपलेला 3 फुटांचा इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा जातीच्या विषारी नागाला मोठ्या शिताफीने पकडला..
साप पकडल्यानंतर तेथील नागरिक आक्रमक झाले. परंतु सर्पमित्र अमोल जाधव यांनी स्थानिक लोकांचे सांत्वन करून या विषारी नागाला बारामती वनविभागाच्या ताब्यात दिले आणि वन कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या निर्जनस्थळी निसर्गात या सापाला मुक्त केले..
मनीषा यांना दहा वर्षाचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मात्र ढाळे कुटुंबातील आणि ठोंबरे कुटुंबातील या दुर्देवी घटनेमुळे जळोची गावावर शोककळा पसरली होती.











