माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – भोर तालुक्यातील नसरापूर येथे वीज अंगावर कोसळून आदिवासी कातकरी समाजातील दोन शाळकरी मुली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत मयत झालेल्या मुलींच्या कुटुंबांना शासनाने मंजूर केलेल्या प्रत्येकी चार लाखांचा धनादेश आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. विशेष म्हणजे कोरोनाच्या व्यापात असताना सुद्धा महसूल प्रशासनाने वेळेत पाठपुराव्याने केल्याने अल्प दिवसात मदतीची पूर्तता करून संवेदनशीलता दाखवली.
नसरापूर चेलाडी फाटा ( ता. भोर ) येथे दि. २ मे रोजी वीज कोसळून झालेल्या घटनेत सीमा अरुण हिलम वय ११, अनिता सिंकदर मोरे वय ९ या दोन शाळकरी मुली ठार झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती सहायता निधीनुसार प्रत्येकी चार लाखाचा धनादेश आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते मृत मुलीचे पालक अरुण हिलम, सिंकदर मोरे यांना देण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, उपसभापती लहूनाना शेलार, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, उत्तमराव थोपटे, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, सदस्य नामदेव चव्हाण, ज्ञानेश्र्वर झोरे, माजी उपसरपंच शंकर शेटे, युवराज वाल्हेकर, दगडू हिलम, दादा माने आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे आणि महसूल अधिकारी यांनी विशेष पाठपुरावा केल्याने तातडीने आर्थिक मदत मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी माहिती दिली. दरम्यान, घटना घडल्यानंतर तातडीने प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार अजित पाटील यांनी मृत कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून शासकीय तरतुदी लनुसार प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.
येथील कातकरी समाजाला जातीचे दाखले मिळत नसल्याची बाब समोर आल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी तत्काळ जातीचे दाखले देण्यासाठी जुन्या नोंदी व लागणारे पुरावे जमा तसेच त्यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेत कायम वास्तव्य करण्याचे सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या.











