इंदापूर : महान्यूज लाईव्ह
शासकीय विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण समितीच्या जिल्हा सदस्यपदी इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
उद्योग ऊर्जा व कामगार मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन निर्णयानुसार उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शासकीय विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीचे कार्यक्षेत्र चार लोकसभा व २१ विधानसभा असे असून पुणे विभागातून सहा सदस्य २१ विधानसभेचे आमदार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज पाहणार आहेत.
स्वप्निल सावंत यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्यांना मदत केली आहे. इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्षपद मिळाल्यापासून अल्प काळात त्यांनी आपल्या कार्याने नावलौकीक वाढवल्याने काँग्रेस पक्षाने पक्षाच्या कोट्यातून शासकिय समितीच्या सदस्य पदासाठी सावंत यांची शिफारस केली होती.
स्वप्निल सावंत म्हणाले, पुणे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात पुणे जिल्ह्यातील महावितरणशी निगडीत असणाऱ्या कामांना प्राधान्य देणार असून काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी वर्गाच्या अडचणींना प्राधान्यक्रम देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.











