सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पंढरपूरची पोटनिवडणूक झाल्यानंतर सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत, सोलापूरच्या वाट्याचे पाणी इंदापूरला देण्यास तीव्र विरोध केला. यामध्ये सोलापूरचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे हे आघाडीवर राहिले. आज त्याचाच परिणाम म्हणून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या सर्व आमदारांच्या समक्ष 22 एप्रिल रोजी इंदापुरातील खडकवासला कालव्यात उजनीतील पाच टीएमसी पाणी सोडण्याच्या योजनेचे सर्वेक्षण करण्यासाठी मंजुरी देणारा 22 एप्रिल रोजीचा निर्णय रद्द झाल्याचे जाहीर केले! हा विषय इंदापूरच्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केला होता आणि तो राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी संपवला!
गेली तीस वर्ष आमच्या उशाला उजनी धरण आहे आणि तरी आमच्या घशाला कोरड आहे असे म्हणत इंदापूरकर बेंबीच्या देठापासून ओरडत बसले आहेत.. 22 एप्रिल रोजी या धरणातून पाच टीएमसी पाणी उपसण्यासाठी या अगोदर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत ठरल्यानुसार सर्वेक्षणाकरिता मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. विशेष म्हणजे फक्त सर्वेक्षणाला मंजुरी दिली आणि तरीही तिकडे सोलापुरात सगळीकडे मोठा गदारोळ उठला.. एकीकडे इंदापुरात शेतकरी हे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयाबद्दल पेढे वाटत होते; तर दुसरीकडे सोलापुरातील लोक भरणे यांचा पुतळा पाण्यात बुडवत होते! मात्र सोलापुरात असलेला आगडोंब राष्ट्रवादीने अखेर शमवला. राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेल्या मागणीनुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचाच निर्णय फिरवला आणि आज उजनीच्या पाण्याचा विषय सर्वेक्षणातून सुरु झाला होता; सर्वेक्षणापूर्वीच संपला!
राजकारणाची भारी गंमत असते म्हणतात… मुळात उजनीचे पाणी कधी मिळणार? पाच टीएमसी पाणी उचलण्यासाठी लागणाऱ्या दहा हजार अश्वशक्ती वीज पंपाचे पैसे कोण भरणार? प्रत्यक्ष योजना अस्तित्वात आल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना खर्चामध्ये किती फटका बसणार? याची कोणतीच गणिते मांडली नसताना फक्त पाणी मिळणार मिळणार म्हणून शेतकरी अगदी हत्तीवरून साखर वाटण्यासाठी तयारीत राहिले.. आणि तिकडे काहीच माहिती नसताना; पाण्याचे फेरवाटप झालेले नसताना सोलापुरातील लोक उर बडवत होते.
ज्या महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला; त्याच महाविकास आघाडीचे तेथील स्थानिक नेते या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करत होते.. सारीच गंमत नाही का?.. भाजपचा तर विषयच वेगळा! कोणाला निर्णय झाला म्हणून पोट दुखत होते, तर कोणी आपले पाणी जाईल म्हणून लोकांच्या भावना पेटवत दिवस-रात्र कष्टत होते!
इंदापूरकरांच्या बाबतीत बोलायचे झाले तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निर्णय घेऊन, इंदापूर मधील दुष्काळी शेतकऱ्यांच्या मनात जागा निर्माण केली. आता हे पाणी मिळाले काय आणि मिळाले नाही, तरीदेखील त्यांचे फारसे काही बिघडणार नाही. पण खरोखरच तीस वर्षे जे लोक पाण्यासाठी तरसले, त्या शेतकऱ्यांच्या भावना नेमक्या आता काय असतील? याकडे काही दिवस आरोप- प्रत्यारोपाच्या गदारोळात कोणाचेच लक्ष जाणार नाही.
राष्ट्रवादीने तिकडे इंदापुरात सहानुभूती निर्माण केली आणि दुसरीकडे सोलापुरात आमदारांना शांत केले… मात्र मागील दोन महिन्यात पाण्याच्या बेरजा आणि वजाबाकीत धरण समोर असताना देखील, आपल्याला ते पाणी मिळत नाही हे पाहून ज्यांचा जीव तीळ तीळ तुटतो त्यांच्या भावनांना शांत कोण करेल? हा खरा प्रश्न आहे! काही प्रश्न केवळ राजकारणाच्या पलीकडे जात नाहीत हे जरी खरे असले तरी पाण्याचा आणि पोटाचा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा असतो हे जाणून घेऊन यापुढील काळात तरी संवेदनशील विषयावर राजकारण नको एवढा धडा जरी राजकीय पुढाऱ्यांनी घेतला तरी खूप बरे होईल..!











