दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरात ज्येष्ठ नागरीकास कोरोना झाल्यानंतर दौंडची केलेली संचारबंदी श्रीगोंदा तालुक्यासाठीही अडचणीची ठरली. दौंड शहरानजिक असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील तीन गावांना ही संचारबंदी भोगावी लागली आहे.
दौंडमधील बाजारपेठेवर श्रीगोंदा तालुक्यातील बरेचसे व्यवहार अवलंबून असतात, त्या साऱ्यांचीच आता कोंडी झाली आहे, शिवाय दौंड शहरानजिक असलेल्या गार, निमगाव खलु व कोटा या तीन गावांतही सध्या संचारबंदी आहे.
दौंडमध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्यानंतर दौंड शहर व दौंड शहरानजीकच्या तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र व बफर झोन म्हणून दौंड-पुरंदरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी जाहीर केला. त्यामध्ये
दौंडपासून तीन किलोमीटर अंतरामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील तीन गावे येत असल्याने ती तीन गावे प्रतिबंधक क्षेत्र व बफर झोन म्हणून प्रशासनाने सील केल्याची माहिती श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. या गावांचा दौंड शहर व तालुक्याला होणारा संपर्क तोडण्यात आला असून कोरोनाचा संसर्ग या गावांना होवू नये म्हणून आरोग्य विभागाने या गावातील नागरीकांचीही आरोग्य तपासणी करण्यास सुरवात केली आहे.










