सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
मागील महिन्यात २८ एप्रिल रोजी राज्यात पुरवण्यात आलेल्या हेटेरो कंपनीची रेमेडीसीवीर इंजेक्शन्स सदोष आली होती. त्यामुळे काही रुग्णांना समस्याही उदभवल्याने दुसऱ्या दिवशी कंपनीने उर्वरित इंजेक्शन्स माघारी मागवली होती. त्यासंदर्भात इंदापूरातून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली, त्याची गंभीर दखल आयोगाने घेतली असून त्याचा अहवाल देण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य सचिवांना दिल्या आहेत.
आयोगाचे सहायक निबंधक मुकेश यांनी यासंदर्भात राज्याच्या आरोग्य व कुटुंब मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले असून यासंदर्भात तातडीने अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. २८ एप्रिल रोजी राज्यात पुरवण्यात आलेल्या ५ हजार ७६० पैकी ३३७५ इंजेक्शन्स विकण्यात आली होती, त्याचा वापर झाल्यानंतर काही रुग्णांना त्याच्या रिअॅक्शन्स आल्या, त्यामुळे त्याचा वापर तातडीने थांबवून यासंदर्भात कंपनीला कळवण्यात आले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी हिटेरो कंपनीने ही इंजेक्शन्स माघारी बोलवली होती.
त्यावरून यासंदर्भात राज्य सरकारने संबंधित कंपनीविरोधात काहीही कार्यवाही केली नसल्याच्या कारणावरून महाराष्ट्र ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. त्याची दखल घेत आय़ोगाने राज्याच्या आरोग्य सचिवांना अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान यासंदर्भात झेंडे पाटील यांनी आपण या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.











